नेतृत्व

श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

वेबसाइट: http://www.devendrafadnavis.in

महाराष्ट्रचे वर्तमान मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई., बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्त्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

१९९९ पासून सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. १३ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून जनतेचे प्रतिनिधित्त्व करीत असताना विविध समित्यांवर काम केले आहे. त्यामध्ये अंदाज समिती, नगर विकास व गृहनिर्माणावरील स्थायी समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात नेमलेली समिती यांचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिव पदी ते कार्यरत आहेत.

आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील त्यांच्या विश्लेषणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाते. आर्थिक विषमता दूर करण्यासंदर्भातील त्यांचे विचार व त्यांच्या कल्पनांचे तज्ञांनीही कौतुक केलेले आहे. इंधन / ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल अशा विषयांवर बोलण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रित केले गेले आहे.


विचारसरणी

देवेंद्र फडणवीस यांचा ‘बोले तैसा चाले’ या विचारावर ठाम विश्वास आहे. हाती घेतलेले काम ते तडीस नेतातच आणि ते काम अधिकाधिक चांगल्या रितीने करतात. मदत मागणारा कोणीही असो, दिवसरात्र कोणतीही वेळ असो किंवा आव्हान कितीही कठीण असो, जनतेची सेवा करताना देवेंद्र फडणवीस जराही बिचकत नाहीत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला. उच्च शिक्षण असले तरी सदैव जनसामान्यांशी संपर्क ठेवून उत्साहाने लोकाभिमुख कामे करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाती घेतलेले काम तडीस नेईपर्यंत अथवा समस्या सुटेपर्यंत त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यांचे नेतृत्व हे नैतिकतेच्या भक्कम पायावर उभे असलेले पारदर्शी नेतृत्व आहे.

राजकीय टप्पे

 • वर्तमान मुख्यमंत्री, महाराष्ट्र
 • २०१३ – प्रदेश अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
 • २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
 • २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
 • १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
 • १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
 • १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
 • १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

सामाजिक योगदान

 • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
 • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
 • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
 • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
 • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य