नेतृत्व

श्री विनोद तावडे

वेबसाइट: http://www.vinodtawde.com

विनोद तावडे हे महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत. यापूर्वी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहत होते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची सलग तीन टर्म निवड झाली होती. सातत्यपूर्ण, सजग वाटचालीतून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली कारकीर्द घडवली आहे.

वैयक्तिक

मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात २० जुलै १९६३ ला जन्मलेल्या विनोद तावडे यांच्या स्वभावात नेतृत्वगुण अगदी लहानपणापासून होते. पुणे येथील ज्ञानेश्वर विद्यापीठ येथून विद्युत विशारद (B. E.) असलेल्या विनोद तावडे यांनी विद्यार्थीदशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला व भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९५ ते १९९९ या कालावधीत ते भाजप महाराष्ट्राचे महासचिव होते. १९९९ साली श्री. विनोद तावडे यांची भाजपच्या मुंबई महानगर युनिटच्या अध्यक्षपदी निवड झाली.

विरोधी पक्षनेतेपदी असताना विनोद तावडे यांनी कॉंग्रेस-एनसीपी सरकारचे चुकीचे निर्णय व भ्रष्टाचार, घोटाळे उघडकीस आणले. समाजातील सर्व स्तरातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडली. शेतकऱ्यांसाठीची आर्थिक मदत त्यांना वेळेवर मिळते आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी त्यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचे सातत्याने दौरे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सरकारला आरक्षण धोरण स्वीकारणे भाग पडले. युवकांच्या प्रश्नांना ते नेहमीच प्राधान्य देतात, युवा पिढीच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी वेळोवेळी सक्रिय भूमिका घेतली आहे.

शांत, संयमी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. भेदभाव बाजूला सारून लोकांना एकत्र जोडण्यात त्यांची हातोटी आहे. वेग हा जीवनाचा प्राण आहे, केवळ परिवर्तन शाश्वत राहू शकते, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांना भेटणारी, त्यांच्याशी संवाद साधणारी व्यक्ती त्यांचा विशाल दृष्टीकोन आणि त्यांना सामान्य माणसाविषयी वाटणारी कळकळ पाहून भारावून जाते. अतिशय ऊर्जेने, उत्साह व स्फूर्तीने काम करणे हे विनोद तावडे यांचे स्वभाववैशिष्ट आहे.

विनोद तावडे हे स्वतः अनेकांचे प्रेरणास्त्रोत असले तरी त्यांच्यावर अनेकांचा प्रभाव आहे. त्यांची अनेक स्फूर्तिस्थाने आहेत. विद्यार्थीदशेत अभाविपमध्ये काम करत असताना बळवंत आपटे व मदन दास देवी यांनी त्यांच्यावर संस्कार केले. दिवंगत प्रमोदजी महाजन व दिवंगत गोपीनाथजी मुंडे यांनी विनोद तावडे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मार्गदर्शन केले व त्यांना कसलेल्या नेत्यासारखे घडविले. विनोद तावडे यांनी नेहमीच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त व्यक्त केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी इथवर पोहोचू शकलो नसतो असे ते कायम म्हणत असतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनीदेखील विनोद तावडे यांची दृष्टी व्यापक करण्यात मोलाची भूमिका निभावली आहे.

एक कार्यकर्ता म्हणून विनोद तावडे यांच्यावर श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वगुणांचा सखोल प्रभाव आहे. म्हणूनच २००१ मध्ये त्यांनी श्री. नरेंद्रजी मोदी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या मुंबईभेटीनिमित्त एका भव्य समारोहाचे आयोजन केले होते.

भाजपा सरकारचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्यासोबत असलेल्या सौदार्हपूर्ण संबंधांमुळे विनोद तावडे यांना मुंबईतील रस्ते व रेल्वे वाहतुकीच्या सुधारणेसाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प – १ (एमयुटीपी – १) ला परवानगी मिळविण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. या प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळे ते प्रकाशझोतात आले.

मंत्री

ऑक्टोबर २०१४ च्या विधान सभा निवडणुकीमध्ये बोरीवली मतदार संघातून निवडून आल्यावर विनोद तावडे महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य बनले. इतर सर्व आमदारांच्या तुलनेत त्यांनी जास्त फरकाने ही निवडणूक जिंकली, याबाबतीत मुंबईत प्रथम तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाने ते विजयी झाले. शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, युवा कल्याण व सांस्कृतिक कामकाज या विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

मंत्री म्हणून जबाबदारी स्विकारल्यापासून विनोद तावडे आपली कार्यनिष्ठा, जनतेच्या प्रश्नांची योग्य जाण, दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर आपल्या प्रत्येक खात्यात विविध उपाययोजना राबवित आहेत. आधुनिक उपक्रम व नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते त्यांच्या खात्यात योग्यते निर्णय घेत आहेत, बदल आणत आहेत.

व्यक्तिमत्व

सत्ता म्हणजे जास्तीत जास्त जनसेवा करण्याची जबाबदारी असे मानणारे जे मोजके नेते आहेत त्यात विनोद तावडे यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील १२ कोटी लोकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ते समाजातील प्रत्येक स्तराच्या उत्कर्षासाठी, राज्यातील प्रत्येक भागाला न्याय मिळावा यासाठी झटत आहेत. त्यांनी राजकारणाला सामाजिक सक्रियतेची जोड दिली आहे, जेणेकरून राज्याचे व राज्यातील जनतेचे हित साधले जाईल. मेहनत, नीतिमत्ता, पारदर्शक विचार यांवर ठाम विश्वास असणाऱ्या या नेत्याला केवळ मित्रांमध्येच नव्हे तर विरोधकांमध्येही अतिशय आदराचे स्थान आहे.